आपले संविधान भाग १: संविधान म्हणजे काय ?
संविधान म्हणजे काय ? माणूस नेहमी समूहात जगत असतो. हे समूह वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. आपण कुटूंबात , मित्र मंडळीत जगत असतो. असे समूह व्यक्तीला ओळख आणि किमान सुरक्षा देतात. पण तरीही व्यक्तीचे आणि समूहाचे नाते कधीकधी तणावाचे बनते. समूहाचे निर्णय आणि व्यक्तीची इच्छा यात जेव्हा जेव्हा विसंगती येते तेव्हा हा तणाव निर्माण होतो. पण समुहात जगणे व्यक्तीची अपरिहार्यता नसली तरी गरज असते. व्यक्ती आणि समूह यांच्या नात्यात प्रयत्नपूर्वक संतूलन निर्माण करावे लागते. असे संतूलन बनविण्याचे शास्त्र म्हणजे संविधानवाद असे म्हणता येईल. आधुनिक काळातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा समूह म्हणजे राज्य-राष्ट्र. राष्ट्रात राहणा-या व्यक्ती-व्यक्ती मधील संबंध आणि व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी राज्यव्यवस्थेने काही निर्णय घ्यावेत अशी जेव्हा अपेक्षा आपण करतो, तेव्हा आपण त्या राज्यव्यवस्थेस मान्यता देत असतो. नागरिक जेव्हा निवेदन अथवा मोर्चाद्वारे राज्यव्यवस्थेकडे एखादी मागणी करत असतात, तेव्हा त्या व्यवस्थेची अधिमान्यता निश्चित होत असते. राज्यव्यवस्थेकडून जितक्या जास्त अपेक्षा आपण क...