आपले संविधान भाग १: संविधान म्हणजे काय ?

 संविधान म्हणजे काय ?

   माणूस नेहमी समूहात जगत असतो. हे समूह वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. आपण कुटूंबात , मित्र मंडळीत जगत असतो. असे समूह व्यक्तीला ओळख आणि किमान सुरक्षा देतात. पण तरीही व्यक्तीचे आणि समूहाचे नाते कधीकधी तणावाचे बनते. समूहाचे निर्णय आणि व्यक्तीची इच्छा यात जेव्हा जेव्हा विसंगती येते तेव्हा हा तणाव निर्माण होतो. पण समुहात जगणे व्यक्तीची अपरिहार्यता नसली तरी गरज असते. व्यक्ती आणि समूह यांच्या नात्यात प्रयत्नपूर्वक संतूलन निर्माण करावे लागते. असे संतूलन बनविण्याचे शास्त्र म्हणजे संविधानवाद असे म्हणता येईल.

     आधुनिक काळातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा समूह म्हणजे राज्य-राष्ट्र. राष्ट्रात राहणा-या व्यक्ती-व्यक्ती मधील संबंध आणि व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी राज्यव्यवस्थेने काही निर्णय घ्यावेत अशी जेव्हा अपेक्षा आपण करतो, तेव्हा आपण त्या राज्यव्यवस्थेस मान्यता देत असतो. नागरिक जेव्हा निवेदन अथवा मोर्चाद्वारे राज्यव्यवस्थेकडे एखादी मागणी करत असतात, तेव्हा त्या व्यवस्थेची अधिमान्यता निश्चित होत असते. राज्यव्यवस्थेकडून जितक्या जास्त अपेक्षा आपण करतो तितकी ती व्यवस्था अधिक ताकदवान बनत असते. त्यातूनच अशी राज्यव्यवस्था क्रमशः निरंकुश आणि दमनकारी बनण्याचा धोका असतो. सर्व नागरिकांचे अधिकार वा स्वातंत्र्य अबाधित राहावेत, ही जबाबदारी पार पाडतांना राज्यव्यवस्था जे काही निर्णय करेल ते निर्णय एखाद्या दुसऱ्या नागरिकांच्या इच्छेवर गदा आणणारे असू शकतात.

     पण बहुमताने सत्तेवर आलेली राज्यव्यवस्था जेव्हा अप्रामाणिक बनते किंवा फक्त विशिष्ट गटांच्या हितरक्षणासाठी भेदभाव करणारी बनते अथवा आपले शासन अनिर्बंध आणि चिरकाल टिकविण्यासाठी धडपडणारी बनते, तेव्हा प्रश्र्न निर्माण होतात. नागरिकांचे अधिकार व स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी पार पाडण्याकरिता राज्यव्यवस्थेची अधिमान्यता निर्माण व्हावी लागते. पण त्याच वेळी त्यातून ती राज्यव्यवस्था निरंकुश आणि दमनकारी बनू नये, ही काळजही घ्यावी लागते. नेमके हेच काम संविधान करत असते. 

   संविधान एका बाजूला राज्य व्यवस्थेची अधिमान्यता प्रस्थापित करते आणि दुसर्या बाजूला ती राज्यव्यवस्था बेलगाम व नागरिकांचे अधिकार हिरावून घेणारी बनणार नाही, याची काळजी घेते. यालाच उदारमतवादी संविधानवाद असेही म्हणतात.

   संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो. वेळोवेळी बनणारे देशातील अन्य कायदे हे या मूलभूत कायद्याशी सुसंगतपणे बनविलेले असतात.

   क्रमशः

            संकलन:-नुरखॉं पठाण

               गोरेगाव-रायगड

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान भाग४: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

आपले संविधान भाग-१७

आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक