आपले संविधान भाग २: भारताचे संविधान कसे आणि कधी बनले?
भारताचे संविधान कसे आणि कधी बनले?
भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ब्रिटिश सरकारबरोबर दीर्घकाळ लढा झाला आणि त्यांच्या बरोबर वाटाघाटींचे सत्रही सुरू राहीले. त्याच्याच एका टप्प्यावर ब्रिटिश सरकारने पाठविलेल्या कॅबिनेट मिशनने भारतात घटनात्मक राज्यपद्धती आणण्यासाठी संविधानसभा निवडण्याचा निर्णय घेतला. कॅबिनेट मिशनने प्रस्तावित केल्याप्रमाणे १९४६ साली प्रांतिक विधानमंडळावर निवडून आलेल्या सदस्यांनी मतदान करून संविधानसभेसाठी एकूण ३८३ सदस्य निवडले. या संविधानसभेची पहीली बैठक ९ डिसेंबर १९४६ या दिवशी दिल्लीत झाली. ११ डिसेंबर १९४६ च्या संविधानसभेच्या बैठकीत सभेचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समिती तयार करण्यात आली. या मसुदा समितीच्या पहिल्या बैठकीत २९ आॅगस्ट १९४७ ला मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली.
भारत सरकारच्या राजपत्राद्वारे घटनेचा मसुदा जनतेच्या माहितीसाठी व जनतेकडून सुचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. संविधानसभेने या मुद्यावर ४ नोव्हेंबर १९४७ पासून २६ नोव्हेंबर १९४९ एवढा प्रदीर्घ काळ चर्चा केली. या चर्चेदरम्यान नागरिकांकडून आलेल्या ७६३५ पैकी २४७३ सुचनाही सभेने विचारार्थ घेतल्या.
अर्थातच संविधान निर्मितीत अनेक मान्यवरांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे, ज्यांचा उल्लेख स्वत: बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणात केला आहे. या सर्व प्रक्रियेत मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली. मसुदा समितीचे अन्य सदस्य आजारपण, परदेश वास्तव्य, मृत्यू अश्या अनेक कारणांनी या कामात सहभाग देवू शकले नाही. त्यामुळे संविधानसभेत सदस्यांनी केलेल्या विविध सुचना कायदेशीर भाषेत आणि सर्वमान्य अशा पद्धतीने शब्दबद्ध करणे, तसेच चर्चेतील मुद्द्यांबाबत इतर देशांच्या संविधानामध्ये असलेल्या तरतुदी सदस्यांच्या माहितीसाठी प्रस्तूत करणे, या जबाबदार्या एकटे बाबासाहेब पार पाडत होते. विविध सामाजिक घटकांचे आग्रही प्रतिनिधित्व करणारे संविधानसभेचे सदस्य आणि त्यांच्या परस्परविरोधी मतमतांतरातून सर्व भारतीयांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी देणारे संविधान सर्वसंमतीने बनविले यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानसभेचे सर्व सदस्य यांचे आपण ऋणी राहीले पाहिजे.
क्रमश:
संकलन:-नुरखॉं पठाण
गोरेगाव-रायगड
Comments
Post a Comment