आपले संविधान भाग ०९

 मागील दोन भागात आपण भाग-१ मधील अनुच्छेद एक व दोन बाबत सविस्तर विचार केल्यानंतर आज आपण अनुच्छेद तीन व चार बघणार आहोत.

   अनुच्छेद-३:-नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यांत फेरफार:

   संसदेला कायद्याद्वारे-

क) कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून अथवा दोन किंवा अधिक राज्ये किंवा राज्यांचे भाग एकत्र जोडून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येईल.

   ख) कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येईल.

    ग) कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवता येईल.

    घ) कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये फेरफार करता येईल.

   ड•) कोणत्याही राज्याच्या नावांमध्ये फेरफार करता येईल.

    अनुच्छेद तीन हे काय सांगत की, संसदेला कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करता येऊ शकते, कोणत्याही राज्याचे क्षेत्र कमी वा जास्त करता येऊ शकते, राज्यांचा सीमेमध्येच नव्हे तर नावामध्ये देखील फेरफार करता येऊ शकते.

   परंतू हे सर्व विधेयक राष्ट्रपतींच्या परवानगीनेच किंवा शिफारशीनेच संसदेमध्ये मांडता येऊ शकते.

   आता आपण अनुच्छेद चार पाहुया.

अनुच्छेद-४:-पहिल्या व चौथ्या अनुसुचीच्या सुधारणेसाठी आणि पुरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरीता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद २ व ३ अन्वये करण्यात आलेले कायदे:-

   १) अनुच्छेद २ किंवा ३ मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही कायद्यात , त्या कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी आवश्यक अशा, पहिली अनुसुची व चौथी अनुसुची यात सुधारणा करण्याविषयीच्या तरतुदी अंतर्भूत असतील आणि संसदेला आवश्यक वाटतील अशाही पुरक आनुषंगिक व परिणामस्वरूप तरतुदी (अशा कायद्याचा परिणाम होणार्या राज्याच्या किंवा राज्यांच्या संसदेतील व विधानमंडळातील किंवा विधानमंडळांमधील प्रतिनिधित्वासंबंधीच्या तरतुदींसह) अंतर्भूत असू शकतील.

  २) अनुच्छेद ३६८ च्या प्रयोजनांकरिता पूर्वोक्त असा कोणताही कायदा या संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही.

   अनुच्छेद चार थोडक्यात काय आहे तर, अनुच्छेद २ व ३ नुसार जी आपण नविन राज्यांची निर्मिती वा नावात किंवा सीमेत बदल करणार आहोत,ते संविधानाच्या अनुच्छेद ३६८ नुसार संविधानातील दुरुस्ती मानली जाणार नाही."

  आपण ह्याच लेखमालेतील भाग-३ मध्ये अनुच्छेद ३६८ बाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. 

    क्रमशः

          संकलन-नुरखॉं पठाण

                   गोरेगाव-रायगड

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान भाग४: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

आपले संविधान भाग-१७

आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक