आपले संविधान भाग-१०

 आज पासून आपण भारतीय राज्यघटनेतील भाग दोन बघणार आहोत.

        भाग-दोन :- नागरिकत्व

   संविधानातील भाग दोन हा नागरिकत्वासंदर्भात आहे. या भागात भारताची नागरिकता कोणाकोणाला लागू आहे, ती कशी मिळते वा काढून देखील कोणकोणत्या कारणांनी घेता येते, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. भाग दोन मधील कलम ५ ते ११ मध्ये याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

    आता ह्या कलमांकडे वळण्याआधी नागरिकता म्हणजे काय? हे आपण बघुया. 

    आता मला सांगा की, कोणत्याही देशात जितके पण लोकं राहतात, काय ते त्या त्या देशाचे नागरिक असतात?, तर नाही. कारण कोणताही देश असो तीथे विदेशी लोक देखील राहतात, नोकरी करतात, शिक्षण घेत असतात. म्हणुन देशातले सगळेच लोकं त्या त्या देशाचे नागरिक नसतात. आता त्या त्या देशाचे नागरिक बनण्याबाबत काही नियम, अटी वा शर्थी  असतात. त्या त्या देशातील नागरिकांना काही विशिष्ट अधिकार व हक्क दिलेली असतात. उदा. आपल्या देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे, निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, अगदी सरकारच्या चुकीच्या वाटणार्या धोरणाविरोधात आवाज उठविण्याचा देखील अधिकार आहे. आणि काही मुलभूत हक्क देखील संविधानाने फक्त आम्हा भारतीयांनाच दिलेले आहेत. उदा. कलम १५, १६, १९, २९, ३० हे असे मुलभूत हक्क आहेत, जे फक्त भारतीयांनांच मिळतात. ह्या सर्व कलमांबाबत आपण पुढे चर्चा करणारच आहोत.

     आता नागरिकता दोन प्रकारची असते. पहिली असते एकेरी नागरिकता आणि दुसरी म्हणजे दुहेरी नागरिकता. आपला देश संघराज्य असुनही आपल्या संविधानाने एकेरी नागरिकत्वाचा स्विकार केलेला आहे. म्हणजेच कश्मिर ते कन्याकुमारी देशाच्या सर्व नागरिकांना एकच ओळख देण्यात आली आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त--भारतीय. तुम्ही देशातील कोणत्याही भागात वा राज्यात वास्तव्य करत असाल, तरी तुमची ओळख ही फक्त भारतीय हीच आहे.

     आता नागरिकतेच्या दुसऱ्या प्रकाराबाबत असं आहे की, संघराज्यातील राज्य आणि केंद्र ह्या दोघांची नागरिकता, अश्या दोन दोन नागरिकता असतात. अशा प्रकारची नागरिकता अमेरिकेसारख्या देशात आहे.

    क्रमशः

                संकलन-नुरखॉं पठाण

                     गोरेगाव-रायगड

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान भाग४: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

आपले संविधान भाग-१७

आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक