आपले संविधान भाग-११

 आता आपण नागरिकत्वाबाबत आपले संविधान काय म्हणते, ते सविस्तर पाहुया:

   अनुच्छेद-५:- संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व:-

    या संविधानाच्या प्रारंभी, भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि-

    १) जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती; किंवा

    २) जिच्या मातापित्यांपैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते; किंवा

    ३) जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान पाच वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे,

   अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल.

    कलम पाच मध्ये संविधानाच्या प्रारंभी कोणकोणत्या व्यक्तींना भारताचे नागरिकत्व प्राप्त असेल, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

    अनुच्छेद-६:- पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क:

   अनुच्छेद पाच मध्ये काहीही असले तरी, जी व्यक्ती, आता पाकिस्तानात सामाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली आहे ती व्यक्ती; जर--

  १) तिचा अथवा तिच्या मातापित्यांपैकी किंवा तिच्या आजा-आजींपैकी कोणाही एकाचा गव्हर्नमेंट आॅफ इंडिया अॅक्ट १९३५ ( मुळात अधिनियमित केल्याप्रमाणे) यात व्याख्या केलेल्या भारतात जन्म झालेला असेल तर; आणि

   २) 

   एक:- अशा व्यक्तीने १९ जुलै १९४८ या दिवसापूर्वी याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्याबाबतीत,आपल्या स्थलांतराच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी असेल तर;

   किंवा

  दोन:- अशा व्यक्तीने १९ जुलै १९४८ या दिवशी किंवा त्यानंतर याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्याबाबतीत, तिने नागरिकत्वासाठी डोमिनिअन ऑफ इंडियाच्या सरकारने नोंदणीसंबंधात नियुक्त केलेल्या अधिकार्याकडे, त्या सरकारने विहीत केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी केलेल्या अर्जावरून, अशा अधिकार्याने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर, या संविधानाच्या प्रारंभी भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल.

   परंतू असे की, कोणतीही व्यक्ती आपल्या अर्जाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी निदान सहा महिने भारताच्या राज्यक्षेत्रात निवासी असल्याशिवाय तिची याप्रमाणे नोंदणी केली जाणार नाही.

   क्रमशः

        संकलन-नुरखॉं पठाण

             गोरेगाव-रायगड

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान भाग४: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

आपले संविधान भाग-१७

आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक