आपले संविधान भाग-१२
आज आपण अनुच्छेद-७ विषयी जाणून घेणार आहोत.
अनुच्छेद-७:- स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क:-
अनुच्छेद पाच व सहा मध्ये काहीही असले तरी, जी व्यक्ती, १ मार्च १९४७ या दिवसानंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून पाकिस्तानात सामाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात गेलेली आहे, ती व्यक्ती भारताची नागरिक आहे असे मानले जाणार नाही:
परंतू असे की, जी व्यक्ती, आता पाकिस्तानात सामाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात याप्रमाणे स्थलांतर केल्यानंतर, पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी, कोणत्याही कायद्याच्या प्राधिकाराद्वारे किंवा तद्न्वये दिलेल्या परवान्याखाली भारताच्या राज्यक्षेत्रात परतली आहे, तिला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही व अनुच्छेद ६ खंड(ख) च्या प्रयोजनाकरिता , अशी प्रत्येक व्यक्ती १९ जुलै १९४८ या दिवसानंतर स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली व्यक्ती असल्याचे मानण्यात येईल.
म्हणजेच अनुच्छेद ७ मध्ये स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व रद्द करण्याबाबत तसेच अशी व्यक्ती पुन्हा भारतात कायमची स्थायिक होण्यासाठी आली असेल, तर तिलाही नागरिकत्व बहाल करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.
क्रमशः
संकलन-नुरखॉं पठाण
गोरेगाव-रायगड
Comments
Post a Comment