आपले संविधान भाग-१५

 आज आपण आपल्या भारत देशाची नागरिकता कशी प्राप्त होते वा करता येऊ शकते, याबाबतचे कलम १० व ११ आणि भारतीय नागरिकत्व कायदा १९५५ बाबत माहिती घेऊया:

   अनुच्छेद १०:-नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे:- या भागातील तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदी अन्वये जी भारताची नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व, संसद जो कोणताही कायदा करेल त्याच्या तरतुदींना अधीन राहून चालू राहतील.

 अनुच्छेद-११:-संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे:- या भागाच्या पूर्वगामी तरतुदींतील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वविषयक अन्य सर्व बाबी यांच्या संबंधी कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे न्युनीकरण होणार नाही.

      भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीची काय पात्रता असावी, हे ठरवण्यासाठी भारतीय नागरिकत्व कायदा १९५५ अस्तित्वात आला. या कायद्यामध्ये २०१९ पूर्वी पाच वेळा गरजेनुसार दुरुस्त्या(सन १९८६, १९९२, २००३, २००५ आणि २०१५) करण्यात आलेल्या आहेत. हा कायदा आणि त्यातील दुरुस्त्या ह्या अनुच्छेद-११ नुसार झालेल्या आहेत.

    नागरिकत्व मिळवण्यासाठी तरतुदी काय आहेत ते पाहुया:-

   १) जन्मतः नागरिकत्व:- भारतीय संविधान लागू होण्याच्या प्रारंभास म्हणजेच २६ जानेवारी १९५० च्यानंतर भारतात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे‌. यातील आणखी एका तरतुदी नुसार १ जुलै १९८७ नंतर भारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती भारतीय असेल, जर तिच्या जन्मावेळी तिच्या मातापित्यांपैकी कोणीही एक भारताची नागरिक असेल.

   २) रक्तसंबंध वा वंशानुसार:- जर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झाला असेल आणि तिच्या जन्मावेळी तिच्या मातापित्यांपैकी (मातेच्या नागरिकत्वावरुन व्यक्तीला नागरिकत्व देण्याबाबत दुरुस्ती १९९२साली झाली.) कोणीही एक भारताची नागरिक असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक असेल.

    परंतू असे की, विदेशात जन्मलेल्या व्यक्तीची नोंदणी भारतीय दुतावासात जन्मानंतर एका वर्षात करणे बंधनकारक आहे.

   ३) रजिस्ट्रेशन/नोंदणी द्वारे नागरिकत्व:- अवैध प्रवासी सोडून जर कोणी इतर अन्य व्यक्ती भारतीय नागरिकत्व साठी अर्ज करत असेल तर पुढील अटी पूर्ण केल्यास तिला नागरिकत्व मिळू शकते:-

   अ):- भारतीय मुळाची ती व्यक्ती अर्ज करण्याअगोदर किमान सात वर्षे वास्तव्य करित असावी.

   आ) भारतीय मुळाची ती व्यक्ती जी अविभाजित भारताबाहेर (पाकिस्तान व बांगलादेश वगळता) कोणत्याही देशाची नागरिक असेल आणि ती त्या देशाचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व प्राप्त करू इच्छिते.

   इ):- विदेशातील ती कोणतीही व्यक्ती जिने भारतीय नागरिकाशी विवाह केला असेल आणि अर्ज करण्याअगोदर किमान सात वर्षे भारतात वास्तव्य असेल.

    इ):- ते सर्व नाबालिग मुले ज्यांचे आई वा वडील भारतीय आहेत.

    ई):- राष्ट्रकुल देशांतील सदस्य असलेल्या देशातील नागरिकांना जे भारतात राहतात वा केंद्र सरकारच्या सेवेत आहेत, ते सर्व अर्जाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवू शकतात.

   ४) भुमी विस्ताराच्या माध्यमातून:- जर नवीन भूभाग भारतात विलीन झाला तर येथिल सर्व नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होते. उदा. १९६१ साली गोवा आणि १९६२ मध्ये पॉंडीचेरी भारतात विलीन झाले, तेव्हा तेथील सर्व नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले. 

     साहजिकच आहे की भारतीय नागरिकत्व कायदा १९५५ खुप विस्तृत स्वरुपात आहे, तो इथे पुर्णपणे मांडणे जागेअभावी शक्य नाही, कोणाला हवा असेल तर त्यांना PDF वैयक्तिक पाठवली जाईल.

    क्रमशः

             संकलन-नुरखॉं पठाण

             गोरेगाव-रायगड

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान भाग४: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

आपले संविधान भाग-१७

आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक