आपले संविधान भाग ३: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये
भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये
जगाच्या पाठीवर २०५ पेक्षा जास्त देश आहेत. पण या सर्व देशांचा आणि त्यांच्या राज्यकारभारांचा अभ्यास जेव्हा तुम्ही-आम्ही करायला सुरुवात करतो, तेव्हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड अभ्यास आणि दूरदृष्टीचा प्रयत्न येतो. एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं लिखित संविधान ह्या खंडप्राय आणि प्रचंड विविधता असलेल्या देशाला लाभले.
वैशिष्ट्य क्र. १ :- भारतीय राज्यघटना ही लिखित आणि विस्तृत स्वरुपात आहे:--
भारतीय राज्यघटना ही केवळ लिखितच नाही तर अतिशय विस्तृत स्वरुपात आहे. जगातील कोणत्याही देशाच्या राज्यघटनेपेक्षा भारताची राज्यघटना ही सर्वात मोठी आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेत केवळ १४ कलमे आहेत. कॅनडा-१४७, चीन-१३८ तर ऑस्ट्रेलिया-१२८ कलमे आहेत. ह्या सर्व देशांशी तुलना करता आपल्या राज्यघटनेत सुरवातीला २२ भाग, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे होती. आज भारतीय राज्यघटनेत २५ भाग, ४४८ कलमे आणि १२ परिशिष्टे आहेत. आणि म्हणुनच जगातली सर्वात मोठी राज्यघटना म्हणून सन्मान आपल्या संविधानाला मिळतो.
वैशिष्ट्य क्र.- २ :- प्रचंड अभ्यास आणि विविध स्रोतांपासून निर्मित :--
भारतीय राज्यघटना ही प्रचंड अभ्यासातून आणि विविध स्रोतांपासून निर्माण करण्यात आलेली आहे. घटनाकारांनी केवळ जगातील विविध देशांच्या राज्यघटनांचाच नाही तर भारतीय समाज, जात, धर्म आणि परंपराचा देखील अभ्यास केलेला आहे. राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा प्रभाव दिसून येतो. अमेरिकन राज्यघटनेवरुन मुलभूत हक्क आणि न्यायालयिन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश, आयर्लंडच्या राज्यघटनेवरुन मार्गदर्शन तत्त्वांचा स्विकार करण्यात आला आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भगवान गोतम बुद्धांच्या शिकवणुकीचा देखील प्रभाव आणि स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या कित्येक सामाजिक चळवळींचा देखील प्रभाव आपल्या संविधानावर आहे आणि म्हणुनच ते सर्वसमावेशक आणि सर्वांना आदरास पात्र असे आहे.
वैशिष्ट्य क्र.-३:- अंशतः लवचिक आणि अंशतः ताठर:--
काळानुरूप बदलत जाणार्या परिस्थिती व गरजेनुसार घटना दुरुस्तीची प्रक्रिया ही सर्वसामान्य बाबींसाठी पुरेशी लवचिक आणि महत्त्वाच्या बाबींसाठी पुरेशी ताठर आहे. त्याचा योग्य मेळ राज्यघटनेत घालण्यात आलेला आहे. राज्यघटनेतील कलम ३६८ हे घटना दुरुस्तीचे कलम आहे. योग्य ती प्रक्रिया पार पाडून आणि संविधानाच्या मुलभूत गाभ्यात कुठलाही बदल न करण्याचे बंधन पाळून संविधानात आवश्यक ते बदल करण्याची तरतूद ह्या कलमामध्ये आहे.
हे वैशिष्ट्य खुप महत्वाचे आहे, कारण ब्रिटिशांच्या अगोदर भारतात राजे-रजवाडे, सुलतान, बादशहा, संस्थानिक, वतनदार यांचे राज्य होते. आणि हे सर्व आपापल्या पुरोहितांच्या मान्यतेने कारभार करत. समाजजीवनावर पुरोहितशाहीतून आलेल्या धर्म संकल्पना आणि परंपराचा प्रभाव होता. त्यामुळे कितीही परिस्थिती वा काळ बदलला तरी यात बदल संभव नव्हता, याचा प्रत्यय आज देखील आपणा सर्वांना येतो. आणि म्हणुनच कलम ३६८ हे खुप महत्त्वपूर्ण कलम आहे.
क्रमशः.
संकलन-नुरखॉं पठाण
गोरेगाव-रायगड
Comments
Post a Comment