आपलं संविधान भाग-१९
भाग-तिसरा:- मुलभूत अधिकार
शासकीय स्तरावरून सर्व प्रकारचे भेदभाव मिटवून समानतेचा अधिकार देणारे कलम-१५ बाबत सविस्तर माहिती बघुया...
अनुच्छेद-१५:- धर्म, वंश,जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई...
1. राज्य, कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशाप्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यांपैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही.
नियम 1 सांगतो की सरकारी स्तरावरून कोणत्याही भारतीय व्यक्तीबाबत जात, धर्म, लिंग, वंश अथवा जन्मस्थान इत्यादी कारणास्तव भेदभाव होणार नाही.
2. केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यांपैकी कोणत्याही कारणावरून कोणताही नागरिक---
१. दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल आणि सार्वजनिक करमणूकीची स्थाने यांत प्रवेश करणे; किंवा
२. पुर्णत: किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करण्यात येणाऱ्या पैशाने राखलेल्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरिताच खास नेमून दिलेल्या अशा विहीरी, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि सार्वजनिक वापराच्या जागा यांचा वापर करणे,
यांबाबतीत कोणतीही नि:समर्थता, दायित्व, निर्बंध किंवा शर्त यांच्या अधिन असणार नाही.
या नियम २ मध्ये असे म्हटले आहे की, कोणत्याही भारतीय व्यक्तीला जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान या कारणांवरून दुकाने, सार्वजनिक हॉटेल, सिनेमा हॉल, विहीर, तलाव, अंघोळीचे घाट, रस्ते अथवा सार्वजनिक वापराच्या जागा इत्यादी ठिकाणी येण्यास वा उपभोग घेण्यास रोखले जाणार नाही.
3. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, स्त्रिया व बालके यांच्या करता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही.
या नियमात महिला व बालकांसाठी विशेष व्यवस्था करण्याची परवानगी शासनाला देण्यात आली आहे. जशे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याची तरतूद किंवा मुलांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद.
क्रमशः
संकलन-नुरखॉं पठाण
गोरेगाव-रायगड
Comments
Post a Comment