आपले संविधान भाग-२६
भाग तिसरा-मुलभूत अधिकार
आज आपण अनुशेष (BACKLOG) जागांबाबत तरतूद असणारे अनुच्छेद-१६ मधील नियम 4 (ख) बाबत माहिती घेऊया....
अनुच्छेद-१६:- सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबींमध्ये समान संधी--
4 (ख):- या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, राज्याला, खंड 4 किंवा खंड 4 (क) अन्वये आरक्षणासाठी केलेल्या कोणत्याही तरतुदीनुसार, एखाद्या वर्षात भरण्यासाठी म्हणून राखून ठेवलेल्या परंतू त्या वर्षात रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत, पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षांमध्ये भरावयाच्या रिक्त जागांचा एक स्वतंत्र वर्ग म्हणून विचारात घेण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही आणि अशा वर्गातील रिक्त जागा, ज्या वर्षामध्ये त्या भरण्यात येतील त्या वर्षातील रिक्त जागांच्या पन्नास टक्के इतकी आरक्षणाची मर्यादा ठरविण्याकरिता, त्या वर्षातील इतर रिक्त जागांबरोबर जमेस धरल्या जाणार नाही.
म्हणजेच जर एखाद्या राज्यात पदांची भरती करतांना, त्या वर्षी, ज्या कोणत्याही आरक्षित गटातील जागा भरल्या गेल्या नाहीत किंवा रिक्त राहिल्या, तर त्या जागा त्याच वर्षी किंवा पुढील वर्षात एक स्वतंत्र वर्ग म्हणून भरण्यात येतील. आणि ज्याही वर्षी त्या भरल्या जातील, त्या वर्षीच्या रिक्त जागांमध्ये त्या गणल्या जाणार नाही. म्हणजेच त्या वर्षीच्या रिक्त जागांच्या भरतीमधील आरक्षणाच्या पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेत त्या गणल्या जाणार नाही.
भारत सरकारने २००० साली ८१ वी घटनादुरुस्ती करून सदर कलमाचा संविधानात समावेश केला. थोडक्यात, या घटनादुरुस्तीने अनुशेष रिक्त जागांच्या आरक्षणावरील ५०% ची मर्यादा संपुष्टात आणली.
क्रमशः
संकलन-नुरखॉं पठाण
गोरेगाव-रायगड
7276526268
Comments
Post a Comment