आपलं संविधान भाग-२०

 भाग-तिसरा:- मुलभूत अधिकार

   आजच्या भागात आपण आरक्षणाची तरतूद करण्याबाबतचे कलम-१५ तील नियम 4 बाबत सविस्तर माहिती घेऊया...

  अनुच्छेद-१५:- धर्म, वंश,जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई...

  या आधिच्या भागात आपण नियम 1, 2 व 3 बाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे.

    4. या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद २९ चा खंड (२) यातील कोणत्याही गोष्टीमुळे, नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गांच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही.

    घटनेतील हे कलम आरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आरक्षण हा अतिशय संवेदनशील मुद्दा असल्याने त्याविषयी थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे. आरक्षणाचा ढोबळपणे अर्थ "राखीव जागा" असा घेतला जातो. मुळात इथेच सर्व गोंधळ होतो. आरक्षणाचा संविधानिक अर्थ म्हणजे "किमान प्रतिनिधित्वाची संधी" (minimum opportunity for representation). हे प्रतिनिधित्व जातीच्या आधारावर ज्यांना मुलभूत अधिकारांपासुन वंचित ठेवण्यात आले होते, त्यांच्यासाठी आहे. 

    याबाबत अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, अनेकांकडून मी ऐकून आहे की, आरक्षण फक्त १० वर्षांसाठीच होते. याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, आरक्षण हे ....

    १)राजकीय आरक्षण,

    २)शैक्षणिक आरक्षण,

    ३) नोकऱ्यांमधील आरक्षण,  असे तीन प्रकारचे आहे. यातील राजकीय आरक्षण हे पहिल्या १० वर्षांसाठी असावेत, असे घटना समितीने ठरवले होते. पण जर का या दहा वर्षात या जातींची पुरेशी प्रगती झाली नाही, तर ही मुदत वाढविण्याची तरतुद संविधानात केलेली आहे. इतर शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबत असे काहीही ठरलेले नाही. मग प्रश्न पडतो की,  हे दोन्ही आरक्षण कधीपर्यंत असेल, तर या प्रश्नाचे साधे आणि सरळ एकच उत्तर आहे..... जात अस्तित्वात असेपर्यंत.

     भारतात एकूण ६,३०० च्या वर जाती आहेत. आरक्षणाची वर्गवारी खालील प्रमाणे आहेत. सदर तक्त्यातील समाविष्ट जाती ह्या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत.

   १) अनुसूचित जाती (SC) -    एकूण जाती = ५९.

    आरक्षण -- १३%.

   २) अनुसूचित जमाती (ST) -

एकूण जाती = ४७.

    आरक्षण -- ७%.

   ३) इतर मागासवर्ग (OBC) -

एकूण जाती = ३४६.

    आरक्षण -- १९%.

   ४) विशेष मागास वर्ग (SBC) -

एकूण जाती = ७.

    आरक्षण -- २%.

  ५) भटक्या जमाती 'अ' (VJ) -

एकूण जाती = १४.

    आरक्षण -- ३%.

  ६) भटक्या जमाती 'ब' (NT-B)-

एकूण जाती = ३५.

    आरक्षण -- २.५%.

  ७) भटक्या जमाती 'क' (NT-C)

 एकूण जाती = १.

     आरक्षण -- ३.५%.

  ८) भटक्या जमाती 'ड' (NT-D)

एकूण जाती = १.

     आरक्षण -- २%.

   अशा प्रकारे ,

एकूण आरक्षण = ५२% आणि ते घेणाऱ्या एकूण जाती = ५१०.

   क्रमशः

               संकलन-नुरखॉं पठाण

             गोरेगाव-रायगड

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान भाग४: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

आपले संविधान भाग-१७

आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक