आपले संविधान भाग-२८
भाग तिसरा-मुलभूत अधिकार
आज आपण भारतीय समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले अस्पृश्यता निर्मूलनाबाबतचे कलम-१७ बघणार आहोत...
अनुच्छेद-१७:- अस्पृश्यता नष्ट करणे..
"अस्पृश्यता" नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरुपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. "अस्पृश्यतेतून" उद्भवणारी कोणतीही नि:समर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.
म्हणजेच कायद्याने समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून त्या संबंधातील कोणत्याही प्रकारचे आचरण हे केवळ निषिध्दच नव्हे तर शिक्षापात्र अपराध देखील ठरवण्यात आले आहे.
आता ही अस्पृश्यता नेमकी काय आहे, तर भारतीय समाज व्यवस्थेतील ज्या समाजाच्या व्यक्तींच्या साध्या स्पर्शाने देखील विटाळ होतो, असे मानले जायचे वा जाते, त्या समाजास अस्पृश्य समाज म्हटले जाते आणि अशा समाजाला समाजप्रवाहातील सर्व हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवण्यासोबतच अपमानास्पद वागणूक देखील देण्यात येते, यालाच सर्वसाधारणपणे "अस्पृश्यता" म्हणता येईल. भारतीय समाजात शेकडो जाती ह्या अस्पृश्य समजल्या जातात. अस्पृश्य जातीत जन्माला आलेली व्यक्ती ही आयुष्यभर अस्पृश्यच राहते व तीला कोणत्याही शुद्धीकरणाने स्पृश्य होता येत नाही, अशी परंपरागत कल्पना आहे.
अस्पृश्यता निवारण्याकरिता भारताच्या निरनिराळ्या राज्यात १९३६-३७ साली आणि विशेषतः १९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अनेक अधिनियम करण्यात आले. या अधिनियमांतील तरतूदींची अंमलबजावणी करण्यात प्रचंड अडचणी आल्या. सार्वजनिक वापरातील अनेक ठिकाणे ही खाजगी मालकीची आहेत, अशी भूमिका सनातनी लोकांनी घेतली. त्यामुळे ठिकठिकाणी अधिनियमाची कलमे हाणून पाडण्याते ते यशस्वी झाले. सनातनी लोकांना असला गैरफायदा घेता येऊ नये, म्हणून सर्व देशात एकच प्रकारचा कायदा लागू करुन राज्याराज्यातील या संदर्भातील विसंगती व फरक टाळणे अनुभवांती आवश्यक झाले.
भारतीय संविधान तयार करतेवेळी ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेण्यात आली व त्याप्रमाणे संविधानाच्या अनुच्छेद १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट केली असल्याचे व अस्पृश्यता पाळण्यास मनाई करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.
क्रमशः
संकलन-नुरखॉं पठाण
गोरेगाव-रायगड
7276526268
Comments
Post a Comment