आपले संविधान भाग-२२

 भाग-तिसरा:- मुलभूत अधिकार

    आजच्या भागात आपण सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत समानता देणारे कलम-१६ बाबत सविस्तर माहिती बघुया....

   अनुच्छेद १६:-सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबींमध्ये समान संधी--

    1. राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरिल सेवायोजन किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबींमध्ये सर्व नागरिकांस समान संधी असेल.

     हा नियम सांगतो की, भारतीय नागरिकाला देशातील कोणत्याही सरकारी नियंत्रणाखालील कोणत्याही पदावर नोकरी वा रोजगार देण्याबाबत भेदभाव केला जाणार नाही. 

    आता हा भेदभाव कोणत्या आधारावर होणार नाही, हे पुढे नियम 2 मध्ये नमूद केलेले आहे.

    2. कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कूळ, जन्मस्थान, निवास या किंवा यांपैकी कोणत्याही कारणांवरून राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही सेवायोजन किंवा पद यांच्याकरिता अपात्र असणार नाही, अथवा त्यांच्याबाबतीत त्याला प्रतिकूल असा भेदभाव केला जाणार नाही.

      नियम 2 वाचल्यावर अधिक स्पष्ट होते की, धर्म, वंश, जात, लिंग, कूळ, जन्मस्थान आणि निवास ह्या सात कारणांनी आपल्या सोबत राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावर नोकरी वा रोजगार देण्याबाबत भेदभाव केला जाणार नाही.

     आपण अनुच्छेद-१५ मध्ये धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थान या पाच कारणांमुळे आपल्या सोबत भेदभाव होणार नाही, हे बघितले. पण अनुच्छेद-१६ मध्ये कूळ आणि निवास हे दोन अधिकचे घटक वाढून एकूण सात कारणांनी आपल्या सोबत राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावर नोकरी वा रोजगार मिळण्याबाबत भेदभाव होणार नसल्याबाबत नमुद करण्यात आले आहे.

    म्हणजेच तुम्ही भारतीय म्हणुन भारतात कुठेही नोकरी वा रोजगार मिळवून राहू शकता, असे अनुच्छेद-१६ चे नियम 1 व 2 सांगतात.

     पण घटक राज्यांना स्थानिक रहिवासी यांना प्राधान्य देण्याबाबत नियम-3 मध्ये काय अधिकार देण्यात आले होते न् नंतर त्यात काय दुरुस्ती केली गेली, ते आपण पुढील भागात पाहू....

     क्रमशः

           संकलन-नुरखॉं पठाण

           गोरेगाव-रायगड

           7276526268

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान भाग४: भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये

आपले संविधान भाग-१७

आपले संविधान भाग ६: संविधानाचे प्रास्ताविक